Jalgaon Train Accident: मुंबईकडे निघालेल्या अप लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या पँट्री कारला आग लागल्याच्या अफवेने सर्वसाधारण बोगीतील काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या टाकल्या, मात्र त्याच वेळी डाउन रेल्वेमार्गावरून येणाऱ्या 12627 डाउन कर्नाटक बंगळुरू-नवी दिल्ली एक्स्प्रेसखाली आल्याने 12 प्रवाशांचा चिरडून मृत्यू झाला, तर 15 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. काळीज पिळवटून टाकणारी ही धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वेस्थानकाजवळ बुधवारी (22 जानेवारी) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
आगीच्या अफवेने प्रवाशांनी गमावला जीव
समजलेल्या माहितीनुसार, अप पुष्पक एक्स्प्रेस परधाडे स्थानकाजवळून जात असताना रेल्वेरूळांच्या चाकांमधून ठिणग्या उडाल्याची तसेच पँट्री कारमधून धूर येत असल्याची अफवा गाडीच्या एका सर्वसाधारण बोगीतील प्रवाशांपर्यंत पोहोचताच त्यांनी चैन पुलिंग करून गाडी परधाडे स्थानकाजवळ थांबविली. अचानक प्रवाशांनी आग, आग म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात करताच काही प्रवाशांनी बोगीच्या दोन्ही बाजूंना उड्या टाकल्या आणि त्याच वेळी डाउन ट्रॅकवरून 12627 कर्नाटक बंगळुरू-नवी दिल्ली एक्स्प्रेस आल्याने त्याखाली चिरडून 12 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले.
मृतदेहांचा खच: काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना
रेल्वे प्रवाशांनी सुरुवातीला बोगीत आग लागल्याचा भ्रम करून जीव वाचविण्याच्या आकांताने चैन पुलिंग करीत जागेवर गाडी थांबवून पटापट रेल्वेबाहेर उड्या टाकल्या. मात्र, त्याच वेळी क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातली. धावत्या बंगळुरू एक्स्प्रेसखाली आल्याने प्रवाशांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले.कुणाचा पाय, तर कुणाचा हात, तर कुणाचे शरीर वेगवेगळे होऊन रेल्वे ट्रॅकवर तसेच रेल्वेखाली विखुरले गेले. रेल्वेतील प्रवाशांमध्ये ही धक्कादायक वार्ता कळताच त्यांच्या गोटात खळबळ उडाली.
जिल्हा प्रशासनाकडून अपघाताची दखल : उपचाराची व्यवस्था
जिल्हा प्रशासनाकडून जखमी व इतर प्रवाशांसाठी नजीकच्या स्थानकांवर तात्पुरती निवासी व्यवस्था करण्यात आली, तसेच घटनास्थळावर आठ रुग्णवाहिका, पाण्याचा टँकर तसेच अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय, पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्वतोपरी जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय कंट्रोल रूम म्हणून जाहीर
जिल्हा प्रशासनाने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जिल्हाधिकारी कार्यालय कंट्रोल रूम म्हणून जाहीर केले आहे. रेल्वेखाली येऊन ठार झालेल्या प्रवाशांची ओळख परेडसाठी फॉरेन्सिक टीम पाठविण्यात आली आहे.
भुसावळ डीआरएमसह ताफा घटनास्थळी
भुसावळच्या डीआरएम ईती पाण्डेय यांच्यासह एडीआरएम तसेच रेल्वेच्या विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनमाडसह भुसावळ येथून ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली, तसेच रेल्वेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी कटर व इतर साहित्य घेऊन दाखल झाला.
आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल
अपघाताचे वृत्त कळताच आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी दाखल होत माहिती जाणून घेतली. अपघाताची पूर्ण माहिती घेऊन जखमींना उपचारार्थ हलवण्याच्या सूचना केल्या.
गंभीर जखमींवर पाचोऱ्यात उपचार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्हा प्रशासन व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले, तर गंभीर जखमींवर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळविण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाइकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चादेखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन
रेल्वे अपघातात 12 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातामुळे छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण ठरणार आहे. मृत प्रवाशांसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून, तसेच मृताच्या खिशातील आधार कार्डवरून प्रथम ओळख पटविण्यात प्राधान्य दिले जात आहे. बहुतांश मृत उत्तर प्रदेशातील असल्याची शक्यता असून, मृत व व त्याच्या नातेवाइकांचा डीएनएवरूनदेखील ओळख पटविता येणार आहे. तूर्तास मृतांची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वे अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम
पाचोरा येथील रेल्वे दुर्घटनेवर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पुष्पक एक्स्प्रेस ही लखनौपासून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जात असताना दुपारी पावणेपाचच्या सुमारास जळगावहून पाचोऱ्याच्या जवळ आल्यानंतर या गाडीमध्ये अलार्म चेन पुलिंग झाली. अलार्म चेन पुलिंग झाल्यानंतर प्रवासी या गाडीतून खाली उतरले होते. त्यादरम्यान बंगळुरू येथून दिल्लीला जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने काही प्रवाशांना धडक दिली. त्यात काही प्रवासी जखमी झाले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वैद्यकीय मदत पोहोचविली जात आहे. आसपासच्या रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांतून तसेच रेल्वेची भुसावळ स्थानकातील मेडिकल व्हॅनमधूनही जखमी प्रवाशांवर उपचार सुरू केले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशासनाला मदतीचे निर्देश : पालकमंत्री
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ते म्हणाले की, मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाइकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चादेखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जखमींवर पाचोऱ्यात उपचार
जखमींवर पाचोरा येथील ग्रामीण व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. येथे शासकीय डॉक्टरांसोबतच खासगी डॉक्टरही हजर झाले होते. सुरुवातीला चार जणांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मृतांची ओळख पटलेली नव्हती. नंतर ते मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे आदींनी घटनास्थळी भेट दिली व जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. जखमींना विघ्नहर्ता हॉस्पिटल व वृंदावन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पाचोरा येथे दाखल जखमी
मंजू परिहार (नेपाळ), अबू मोहम्मद (उत्तर प्रदेश), ह्युजला सावंत (नेपाल), दीपक थापा (नेपाळ), धर्माबहादूर सावंत (अल्पवयीन, नेपाळ), हकीम अन्सारी (वय 45, रा. तिलवार रतनपूर, जि. श्रावस्ती), हसनअली (वय 19, गिलोला, जि. बहराईच), विजयकुमार गौतम (वय 33, रा. राणीपूर बगई, जि. बहराईच), उत्तम हरजन (वय 25, रा. बैलपूर, बगई, जि. बहराईच) या जखमींना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
मृतांची नावे
कमला नवीन भंडारी (वय 43, रा. कुलाबा, मूळ रा. नेपाळ), लच्छीराम खभू पासी (वय 40, रा. नेपाळ), इम्तियाअली (वय 35, उत्तर प्रदेश), नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दीकी- असीम (वय 19, रा. उत्तर प्रदेश), जवकला भटे जवकडी (वय 80, रा. नेपाळ), हिनू नंदराम विश्वकर्मा (वय 10. रा. नेपाळ) या सात प्रवाशांची ओळख पटली आहे. उर्वरित पाच प्रवाशांची ओळख पटलेली नाही.
शासनातर्फे जखमींवर मोफत उपचार, पाच लाखांची मदत
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीकच्या रेल्वे दुर्घटनेची माहिती घेतली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगाव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाइट्स आदी आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
दुःखद घटना – खासदार स्मिता वाघ
गाडीतून धूर निघत होता तर लोकांना वाटले आग लागली. गाडी हळू झाल्यानंतर प्रवासी रेल्वेतून बाहेर पडले. रेल्वेचे वळण असल्याने समोरून गाडी येत आहे हेे प्रवाशांच्या लक्षात आले नाही. गाडी आली आणि रेल्वे रुळावरील प्रवासी चिरडले गेले. हे घटना अत्यंत दुःखद असल्याची भावना खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली.