जामनेर : जळगाव जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी नदीत वाहून जाण्याचे प्रकार घडले आहे. यात नगरदेवळा येथे आलेल्या पुरात बुडून दोघांचा मृत्यू ओढवला आहे. यात जामनेर तालुक्यात लहान बालकाचा देखील समावेश झाला आहे. एक दुर्दैवी घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली आहे. शेंदुर्णी येथील नदीत पाय घसरुन पडल्याने एका ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेची शेंदुर्णी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शेंदुर्णी येथे विसदेव जवळ सोनद नदी आहे. या नदीवर पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून पाय घसरून नदीत पडल्याने यशवंत कडोबा सोनवणे (वय ७ ) बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेंदुर्णी येथील कोळीवाडा भागातील विसदेवळी मंदीराजवळ मोराड रस्त्याकडे जाण्यासाठी सोनद नदीवर लहान पुल बांधण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून अजिंठा डोंगर आणि परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या परिसरात सतत पाऊस पडत असल्याने नदीमधील पाण्याचा प्रवाहात वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यातच या पुलामधील पाईपामध्ये घाण अडकल्याने मोरीच्या वरच्या बाजुवरुन नदीचे पाणी वाहू लागले. या कालावधीत मोरीवरुन यशवंत जात होता. परंतु, त्याचा अंदाज चुकल्याने तो पाय घसरुन पाण्यात पडला. या अपघातात यशवंत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
यशवंत हा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतली. परंतु, नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसेच या भागातील पात्र खोल असल्याने शोध घेतांना ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागले. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने शनिमंदीरासमोरील पात्रात यशवंत सापडला. यावेळी ग्रामस्थांनी त्याच्या नाका तोंडातून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. त्यास पुढील उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी यशवंतला मृत घोषित केले. यावेळी यशवंतच्या कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.