Khandesh Run :’खानदेश रन’ स्पर्धेचे जळगाव मध्ये उत्साहात आयोजन, धावपटूंचा मोठा प्रतिसाद

जळगाव : येथील सागर पार्कच्या मैदानावर जळगाव रनर्स ग्रुपने आयोजित केलेल्या ‘खानदेश रन’ स्पर्धेत हजारो जळगावकर सामील झाले होते. रविवार, ५ जानेवारी झालेल्या या स्पर्धेतील दृश्य अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी होते. या स्पर्धेचे उद्घाटन  केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी हिरवी झेंडी दाखवून केले.

खानदेश रन स्पर्धेतील सर्व स्पर्धक सागर पार्क येथे सकाळी साडेपाच वाजता एकत्र आले होते. धावण्यासाठी तयार होत असताना, ‘वॉर्म-अप’ सत्रात जळगावकरांमध्ये उत्साह दिसून आला. त्यातच काहींनी झुंबा डान्स करून इतरांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा ठसा उमटला होता. स्पर्धेच्या स्थळी चैतन्याचे वातावरण  निर्माण झाले दिसून आले.

केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर, ‘वन-टू-थ्री-स्टार्ट’ असा इशारा देण्यात आला आणि सर्व स्पर्धक उत्साहाने धावू लागले. प्रत्येक स्पर्धक जिंकण्याच्या उद्देशाने धावत होता. काही लोकांच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा आनंद तर काहींमध्ये केवळ धावण्याच्या अनुभवाची उत्तम भावना दिसून आली.

याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, नाशिक विभागीय पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत, केदार बारबोले, जैन ईरिगेशनचे संचालक अथांग जैन, सुप्रिम पाईपचे सुरेश मंत्री, ऊद्योजक मनोज अडवाणी, राजेश चोरडिया आदी उपस्थित होते.

‘खानदेश रन’च्या या स्पर्धेला जळगावकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर ठिकठिकाणी स्पर्धकांचे पुष्पवृष्टीत स्वागत होत होते. या स्पर्धत धावण्याचा मान्यवरांनी मोह आवरता आला नाही. मंत्री, रक्षा खडसे, आ. सुरेश भोळे आदी मान्यवरांसह जळगाव रनर्स गृपचे  किरण बच्छाव, विक्रांत सराफ, डॉ. रवी हिराणी, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ.विवेक पाटील आदी धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले होते.