तरुण भारत लाईव्ह । भटेश्वर वाणी । जळगाव शहरात बाहेरगावाहून येणार्या कोणत्याही व्यक्तीला स्वस्त दरात शुद्ध, स्वच्छ, स्वादिष्ट आणि पोषक अन्न मिळावे या उद्देशाने 30 वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या क्षुधाशांती झुणका भाकर केंद्राच्या श्री क्षुधाशांती सेवा संस्था या प्रवासात सुमारे सव्वा कोटीहून अधिक लोकांची भूक भागवली आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मातृह्दयी स्व. डॉ.अविनाशदादा आचार्य आणि प्रख्यात सुवर्ण व्यवसायी व ‘शाकाहार सदाचार’ अभियानाचे पुरस्कर्ते स्व.रतनलालजी बाफना यांच्या चिंतनातून उदयास आलेल्या अन् केशवस्मृती प्रतिष्ठान व आर.सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 9 जून 1992 रोजी डॉ.आचार्य कॉम्प्लेक्समधील एका छोट्याशा जागेत क्षुधाशांती झुणका भाकर केंद्राचा केवळ 4 महिला कर्मचार्यांसह प्रारंभ झाला.
दोन रुपयात झुणका भाकर
प्रारंभी दोन रुपयात दोन पोळ्या किंवा एक भाकर आणि भाजी वा ठेचा असे अन्न मिळायचे. त्या काळात सुंदराबाई पाटील आणि विमलबाई चौधरी यांनी दिलेले योगदान मोठे आहे. प्रारंभी महिन्याला 900 पॅकेटसची विक्री व्हायची. हळूहळू प्रतिसाद वाढत गेला. जळगाव शहरात उद्योग, व्यवसाय, खरेदी-विक्री वा अन्य कामासाठी बाहेरुन येणार्यांना येथे अत्यल्प दरात चविष्ट अन्न मिळू लागल्याने त्याची सर्वदूर चर्चा झाली. त्यातून व्यवसाय वाढला. 1994 पर्यंत केंद्र सुस्थापित झाले. कर्मचार्यांची संख्याही 30-35 पर्यंत पोहोचली. अनेकांनी घरुन डबा आणण्याऐवजी येथील सुविधेची लाभ घेतला, आजही घेत आहेत. केवळ 30 रुपयात चविष्ट वरण, भात, पोळी, भाजी येथे मिळू शकते. यासह विविध चविष्ट पदार्थ येथे अतिशय अल्प किंमतीत मिळतात.
या ठिकाणी दररोज सुमारे 1000 ते 1500 जण भेट देतात. त्यादृष्टिने गेल्या 30 वर्षात सव्वा कोटीहून अधिक लोकांनी येथे तृप्ततेचा अनुभव घेतला असावा, असे नक्कीच म्हणता येईल. या ठिकाणी जेवण केल्यावर बाहेर पडणार्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्यावर तृप्तीची भावना दिसत असते.
कोरोना काळात अनेकांची तृष्णा तृप्ती
कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्ती काळात केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांच्या चतुरस्त्र मार्गदर्शनानुसार श्री क्षुधाशांती सेवा संस्थेने गरजूंना फूड पॅकेटस्, किराणा पॅकेटसचे शहरातील वेगवेगळ्या भागात जावून वितरण केले होते. सध्या या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून संजय बिर्ला हे काम पहातात. कोरोना काळात हॉटेल्स तसेच किराणा दुकानेही बंद असल्याने अनेकांची खूप गैरसोय झाली. ती या संस्थेने आपल्यापरीने दूर करण्याचा प्रयत्न केला. जनसामान्यांची भूक भागवताना आजूबाजूच्या लोकांची तृष्णा तृप्तीचे काम जळगाव जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने वॉटर कुलर बसवून यावर्षीपासून क्षुधाशांतीने प्रारंभ केले आहे.