---Advertisement---

Shirpur News: सोसायट्यांना संगणक मिळाले; जोडणी कोण करणार?

by team
---Advertisement---

शिरपूर : तालुक्यात पहिल्या टप्प्यात ४९ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना संगणकांसह इतर आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, त्या सोसायट्यांत संगणक जोडणीसह कामकाजाविषयी प्रशिक्षण कोण देणार? यासंबंधी मात्र यंत्रणेकडे फारशी माहिती नाही. त्यामुळे सोसायट्यांना देण्यात आलेले संगणक संच सध्यातरी पडून आहेत.

सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायठ्या आर्थिक स्रोतांअभावी डबघाईस आल्या आहेत. या सोसायट्यांना शासनातर्फे सुमारे वर्षभरापासून ‘डिजिटल’ची कास धरून आर्थिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याअंतर्गत बी-बियाणे विक्रीचा परवाना, औषधी विक्री. ऑनलाइन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यातून सोसायट्यांची आर्थिक बाजू सावरण्यास मदत होणार आहे. सोसायट्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शासनातर्फे डिजिटलायझेशनचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील ९० सेवा संस्थांचे संगणकीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात शनिवारी (२१ डिसेंबर) ४९ सेवा संस्थांना संगणक देण्यात आले. अजूनही ४१ संस्थांना संगणक संचांची प्रतीक्षा असून, तेही लवकरच मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

दुसरीकडे सोसायट्यांचे लवकरच डिजिटलायझेशन करण्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, सोसायट्यांना संगणक संच दिले जात आहेत. पण, त्या सोसायट्यांत संगणक जोडणीसह कामकाजाविषयी प्रशिक्षण कोण देणार, असे अनेक प्रश्नही अनुत्तरित आहेत.

ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटीचा अडथळा
तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पोहोचल्याचा दावा यंत्रणेकडून करण्यात येत असला, तरी शिरपूर तालुक्यातील अनेक गावांत अजूनही इंटरनेटची समस्या आहे. कनेक्टिव्हिटीचा अडथळा दूर होत नसल्यामुळे ऑनलाइनची कामे शहराच्या ठिकाणीच करावी लागतात. त्यामुळे आता सोसायट्यांत इंटरनेट सुविधा कशी उपलब्ध होणार, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

या संस्थांना मिळाले संगणक संच

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर, अंजदे, आंबे, अर्थे बुद्रक व खुर्द, बलकुवा, भरवाडे, भटाणे, भोरखेडा, चांदपुरी, उमदा, गरताळ, गिधाडे, करवंद, खामखेडा, हिंगोणी, होळनांथे, दहिवद, जाफोरा, जातोडा, जुने भामपूर, उखळलाळी, कळमसरे, खर्दे बुद्रुक व खुर्द, कुरकळी, कुवा, लैकी, महादेव टेंबे, मांडळ, मांजरोद, नवे भामपूर, न्यू भाटपुरा, सावळदे, शिंगावे, शिरपूर, बभळाज, तासपुरी, तन्हाडी, तन्हाड कसबे, टेकवाडे, उडावद्, वनावल, वरूळ, विखरण, वाडी बुद्रुक, वाघाडी, वाठोडा.

पहिल्या टप्प्यात शनिवारी (२१ डिसेंबर) ४९ विविध कार्यकारी

सोसायट्यांना संगणक संच देण्यात आले. अजूनही ४१ सेवा संस्थांना संगणक संचांची प्रतीक्षा आहे. तेही लवकरच मिळणार आहेत. सोसायट्यांचे लवकरच डिजिटलायझेशन होणार असून, संगणक संच मिळालेल्या संस्था आता ऑनलाइन होणार असून, या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा काढणे, पीक नोंदणी, शासकीय खरेदी केंद्रात माल विक्रीसाठी नोंदणी करणे आदी कामे करणे सोयीचे होणार आहे. गावातच सुविधा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे.
– राजेंद्र वीरकर (साहाय्यक निबंधक, शिरपूर)

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment