---Advertisement---
राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत सरकारने आता अधिक कडक भूमिका घेतली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून लाडकी बहिण योजनेत पात्र महिलांनाच लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन तपासणी करण्याचे सांगण्यात आलं आहे.
राज्य सरकारकडून लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल अशा पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रु. आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही ठिकाणी अपात्र लाभार्थी, चुकीची माहिती, एकाच कुटुंबातील अनेक नोंदी, तसेच e-KYC न केलेल्या अर्जांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शासनाने तपासणी मोहीम अधिक कडक केली आहे. याबाबत आता सखोल तपासणी केली जाणार असून लाभापासून वंचित महिलांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
आता केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष लाभार्थींच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर स्थानिक यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. महिलांचे उत्पन्न, कुटुंबातील सदस्य, आधार-बँक लिंक, तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे का, याची सखोल चौकशी केली जाईल. जर तपासणीत एखादी लाभार्थी अपात्र असल्याचे आढळले, तर तिचा लाभ तात्काळ बंद केला जाईल. गरज भासल्यास चुकीची रक्कम वसूल करण्याचीही कारवाई होऊ शकते.
याबाबत सरकारचा उद्देश स्पष्ट…..
खऱ्या गरजू महिलांपर्यंतच योजना पोहोचवणे. त्यामुळे पात्र महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी अद्याप e-KYC किंवा कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









