Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, अपोलो रुग्णालयात केले दाखल

Lal Krishna Advani :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून, त्यांना शनिवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. अडवाणी यांच्या उपचाराची स्थिती तपासण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि अडवाणी यांच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क  साधला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

लालकृष्ण अडवाणी हे ९७ वर्षांचे आहेत आणि त्यांना मागील 4-5 महिन्यांत चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात देखील त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांचे उपचार अपोलो रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये सुरू आहेत. दरम्यान, डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

यापूर्वी , ३ जुलै रोजी लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच,  २६ जून रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली. काही वेळाने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

अडवाणी यांची आरोग्य स्थिती काही काळापासून अस्वस्थ आहे, ज्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांना यावर्षी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला, परंतु प्रकृतीच्या कारणामुळे ते राष्ट्रपती भवनातील समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. ३० मार्च २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान केला.