---Advertisement---

खानदेशाच्या शेतशिवारांमध्ये बिबट्याचा संचार, ट्रॅप कॅमेरे, गस्ती पथकांसह उपाययोजनांची मागणी

by team
---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात गत सप्ताहात यावल तालुक्यातील किनगाव-साकळी परिसरात महिलेचा हात धरून चालत असलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यास ओढून नेले. तर चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव तसेच हिरापूर रस्त्यालगत मेंढपाळ वस्तीसह बहाळ, वाडे टेकवाडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांसह पशुधनाची हानी झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बुधावल येथे सलग दोन दिवसात एक महिला आणि १० वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे खानदेशातील शेतशिवारात रानडुक्कर आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधनासह सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे.

दरम्यान, वनविभागांतर्गत शासनस्तरावरून मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मदत देण्यात येते. असे असले तरी वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, टेहळणी ड्रोन कॅमेरे, पिंजरे आदी उपाययोजनांसह गस्ती पथक वाढवावे, अशी मागणी केली जात आहे. २०२३-२४ दरम्यानचा मान्सून वगळता गत मान्सूनमध्ये दमदार व समाधानकारक पर्जन्यमान झाले आहे. विशेषतः खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात बागायती कपाशीसह ज्वारी, बाजरी तसेच मका आदी खरीप व रब्बी हंगाम संपुष्टात येत आहे. त्यातच शेतशिवार, माळरान मोकळे होत असल्याने पिकांच्या आडोशाला असलेले रानमांजर, नीलगायी वा बिबटे आदी श्वापदांच्या हल्ल्यांमुळे पशुधनासह सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुका परिसरात पाटणादेवी, पितळखोरे तसेच गौताळा अभयारण्य, गिरणा नदी पात्रालगत भडगाव आणि पाचोरा तालुक्यात तसेच पारोळा तालुक्यालगतचे बरेचसे शेतशिवार वनविभागांतर्गत आहे. या परिसरात रानडुक्कर, नीलगायी विशेषतः बिबट्या या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार आहे. चाळीसगाव तालुक्यात सर्वसामान्य तसेच लहान वासरांसह पशुधनावर बिबट्याकडून हल्ले झाले. आतापर्यंत चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यावल वनविभागात प्रथमच सातवर्षीय लहान बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. जळगाव उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार रांजणगाव, पाटणादेवी, चंडिकावाडी, टेकवाडे, मेहुणबारे तसेच चाळीसगाव तालुक्यात पिंजरे लावून तीन बिबटे पकडण्यात आले होते. या बिबट्यांची रवानगी नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात करण्यात आली आहे.

बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना जळगाव उपवन संरक्षक प्रवीण ए. चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे तसेच यावल उपवनसंरक्षक जमीर एम. शेख यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यानुसार शासन स्तरावरून मदत अनुदान रकमेचे वितरणदेखील करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment