तळोदा : तालुक्यातील खरवड येथे करणखेडा रस्त्यावर विजय मराठे यांच्या शेताच्या बांधावर वन विभागाने लावलेल्या सापळ्यात आणखीन एक बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिक शेतकरी शेतमजूर यांच्यातील भीती काहीशी कमी होऊन जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
तळोदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यात बिबट्याच्या हल्ल्यात जून 23 ते ऑगस्ट 24 या कालावधीत 5 जणांचा जीव गेला आहे मागील 46 दिवसात 6 बिबटे पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. तरी सुद्धा तालुक्यात व परिसरात बिबटे फिरत असल्याने व लोकांना सामोरे जात असल्याने शेतकरी शेतमजूर यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
आज, गुरुवार ३ रोजी खरवड येथील विजय मराठे यांच्या करणखेडा रस्त्यावर असलेल्या शेतमळ्यात वन विभागाने सापळा लावला होता. या पिंजऱ्यात एक शेळी ठेवण्यात आली या शेळीची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या जेरबंद झाला आहे. तसेच अजून एक बिबट्या हा परिसरात फिरत असल्याचे शेतकरी व नागरिक यांनी प्रत्यक्ष बघितल्याचे सांगितले आहे.
मंगळवार, १ रोजी रात्री खरवड येथील मराठे बंधू यांच्या गोठ्याजवळ दोन घोडे बांधलेले असताना दोन बिबटे फिरत असल्याचे त्यांच्या सीसीटीव्हीत कैद झाले. घटनास्थळावरून वन विभागाने सकाळी सात वाजेच्या दरम्यान पिंजरा उचलून शहादा रस्त्यावरील निवासी वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आला.
त्या ठिकाणी त्याची काळजीपूर्वक देखरेख केली जात आहे तरी पुन्हा बिबटे दिसत असल्याने तळोदा शहर कॉलनी परिसरात तसेच तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.