जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यात लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. हा वीज मीटर संदर्भातील प्रकार आहे. एका हॉटेल व्यावसायिकाकडून प्रथम 20 हजार, नंतर 15 हजाराची तडजोडीनंतर अंतिमतः 4 हजारांची लाच मागण्यात आली. जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत संबंधित व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्याने सापळा रचून एकाला रंगेहात पडकण्यात आले आहे. यात सावदा विभागाच्या महिला सहायक अभियंत्यांसह लाईनमन, तंत्रज्ञ यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका हॉटेल व्यवसायिकाकडून त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्याचे काम करणे होते. तक्रारदार यांच्यावर जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला असल्याचे भासवून, तक्रारदार यांच्याकडून सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात, सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे व वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी या तिघांनी बुधवार 18 रोजी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत त्या व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. तडजोडीनंतर 4 हजार रुपये देण्याचे ठरले. ही लाच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सावदा येथील सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे व वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांनी मागितली होती. तर संतोष सुकदेव इंगळे याने 19 डिसेंबर रोजी 4 हजारांची लाच स्वीकारली. म्हणून फैजपुर पोलीस स्टेशन येथे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव यांच्यानेतृत्वात PSI दिनेशसिंग पाटील, पोना किशोर महाजन, पो कॉ राकेश दुसाने यांच्या पथकाने केली .