Lok Sabha Elections : होऊ दे खर्च… कुणाचा खर्च सर्वाधिक, महायुती की मविआ ?

जळगाव : लोकसभा निवडणुकीची जळगाव व रावेरसह महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया आता संपली आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. त्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आता मतदान संपले असून, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान जळगाव व लोकसभा मतदार संघात अनुक्रमे १४ आणि २४ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांनी २५ एप्रिल ते ९ मे दरम्यान झालेला खर्चाचा तपशील प्रशासनाकडे सादर केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मिता वाघ व महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील या उमेदवारांनी सार्वधिक खर्च केला आहे. निवडणूक आयोगाने एका उमेदवाराला प्रचारासाठी ९५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा ठरवून दिली होती.  १२ अपक्ष उमेदवार ५० हजारांचा आकडाही पार करू शकले नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राम्हणे यांचा १० लाखांवर खर्च झाल्याचे दिसून आले आहे.  जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघात खर्च मर्यादेच्या आतच उमेदवारांचा खर्च राहिला आहे.

उमेदवारांना खर्चाचा अंतिम हिशेब द्यावा लागणार

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ३० दिवसांच्या आत अंतिम खर्च सादर करणे बंधनकारक असते. तसेच निकालानंतर मिरवणूक काढल्यास त्याचाही खर्च सादर करणे अपेक्षित असते. त्यानुसार अंतिम आढावा घेतला जातो.

श्रीराम पाटलांनी केला सार्वधिक खर्च
जळगाव आणि रावेर मतदारसंघातील प्रमुख चार उमेदवारांच्या तुलनेत रक्षा खडसे यांचा कमी खर्च झाला आहे. त्यापाठोपाठ करण पाटील (पवार) यांचा खर्च झाला आहे. रक्षा खडसे यांचा ४३ लाख ८४ हजार ९१६ , करण पाटील यांचा खर्च ४३ लाख ८७ हजार ८६६, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांचा सर्वाधिक खर्च म्हणजे ४८ लाख ४७ हजार ५६७ इतका झाला आहे. त्यापाठोपाठ स्मिता वाघ यांचा खर्च ४७ लाख ४९ हजार ११७ रुपये झाला आहे. वंचित आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार युवराज जाधव यांनी ८ लाख ३९ हजार ९४८ तर रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी १० लाख ५३ हजार १३६ रुपये खर्च केले आहेत.