Love Jihad Law : राज्यभरात वाढत्या लव्ह जिहादच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद व फसवणूक करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा तयार करणारे महाराष्ट्र हे दहावे राज्य ठरणार आहे.
देशभरात आतापर्यंत हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा , ओडिसा, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगड अशा नऊ राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्यातील अनेक हिंदू संघटनांनी केली होती. राज्यात वाढत्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर या विरोधात कायदा करण्याची ग्वाही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानुसार आता राज्य सरकारने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली असून या समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव,अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे सचिव हे सदस्य असतील.
हेही वाचा : धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १ ९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू
ही समिती राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन लव्ह जिहाद व फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवणार आहे तसेच इतर राज्यातील कायद्याचाही अभ्यास करणार आहे. तसेच कायद्याचा मसूदा तयार करणे आणि कायदेशीर बाबींचाही अभ्यास करण्याचे काम ही समिती करणार आहे.