Mahakumbh 2025 : मोठी बातमी ! महाकुंभासाठी तयार होणार नवीन जिल्हा, कोणी केली घोषणा

महाकुंभासाठी एक अख्खा वेगळा जिल्हाच योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारने जाहीर केला आहे. या जिल्ह्याचे पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल. शिवाय या जिल्ह्याचे नावदेखील महाकुंभावरूनच ठेवण्यात आले आहे. त्या जिल्ह्याचे ‘महा कुंभमेळा’ असे नामकरण करण्यात आले आहे.

बारा वर्षांतून एकदा होणाऱ्या महाकुंभासाठी उत्तरप्रदेशमध्ये जोरदार तयारी चालू आहे. महाकुंभाच्या परिसरामध्ये व्यवस्था आणि इतर बाबींच्या तरतुदीसाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या बाबींवर काम केले जात आहे. अवघ्या दोन महिन्यांवर महाकुंभ आलेला असताना देशभरातील भाविकांनी प्रयागराजला जाण्याची तयारी सुरू केली आहे.

पुढील वर्षी १३ जानेवारी रोजी महाकुंभाला सुरुवात होईल. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा भक्तीसोहळा चालेल. दर १२ वर्षांनी  महाकुंभाचे आयोजन केले जाते. यामध्ये लाखोंच्या संख्येने देश- विदेशातून भाविक, साधू, तपस्वी येतात. प्रशासनाला या काळात या भागातील व्यवस्थापनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला जातो. आतापर्यंत प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महाकुंभाचे व्यवस्थापन पाहिले जात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा
दोन महिन्यांवर आलेल्या महाकुंभाच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबर रोजी उत्तरप्रदेशचा दौरा करणार आहेत. यावेळी महाकुंभाचे व्यवस्थापन आणि सुरक्षा तरतुदींसदर्भात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.