खुशखबर! मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; जळगावसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

जळगाव/पुणे । मान्सून संपूर्ण राज्याला व्यापून धो-धो पाऊस कधी बरसणार? याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने आनंदवार्ता दिली आहे. मान्सूनने जोरदार पुनरागमन करून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. आज सोमवारपासून पुढील आठवडाभरात राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बसरणार आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे

या भागात अलर्ट?
हवामान खात्याने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आयएमडीने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा-विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छ, संभाजीनगर, जालना, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.