Maharashtra Politics : महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळविले आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यातच महाविकास आघाडीतील घटक पक्षामंध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. आता समाजवादी पक्षाने आघाडी महाविकास आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आरोप केला की, ‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला आहे. अशा स्थितीत त्यांच्याशी युती करण्याबाबत पुन्हा विचार करावा लागणार असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी विध्वंसाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून त्यांचे स्वागत केले होते. यापार्श्वभूमीवर सपा प्रदेशाध्यक्षांचे हे वक्तव्य केले आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्राचाही समावेश होता.
अबू आझमी म्हणाले, ‘महाविकास आघाडीसोबत प्रचारादरम्यान आमच्यात जागावाटप किंवा समन्वय नव्हता. निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा अजेंडा आक्रमकपणे मांडण्यास सांगितले आहे.
आझमी पुढे म्हणाले, ‘६ डिसेंबर रोजी शिवसेनेने (उबाठा) बाबरी विध्वंसाच्या बाजूने एक संदेश सोशल मीडियावर शेअर केला होता. आम्ही हे सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचा पक्ष महाविकास आघाडीपासून वेगळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात अखिलेश यादव यांच्याशी बोलणार असल्याचे अबू आझमी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘शिवसेनेने (उबाठा) वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती आणि बाबरी विध्वंसात सहभागी असलेल्या लोकांना शुभेच्छा दिल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यानेही तो फोटो पोस्ट केला आहे.
आझमी म्हणाले की, महाविकास आघाडीतील कोणीही अशी भाषा बोलत असेल, तर त्यांच्यात आणि भाजपमध्ये काय फरक राहणार?