मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे युग सुरु झाले आहे. या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या क्रांतीस प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राने ज्या वेगाने आयटी क्षेत्रात आपली प्रगती केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्राने एआय क्षेत्रात देखील प्रगती करावी, अशी अपेक्षा माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
मंत्री शेलार यांनी आज विभागातील अधिकाऱ्यांची बैठकीत निर्देश दिलेत. त्यांनी सांगितले की, राज्याने त्याच्या पहिल्या एआय धोरणाचा मसुदा तयार करावा, ज्यामुळे अधिक उद्योग व व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळेल आणि महाराष्ट्र जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेत सक्षमपणे स्पर्धा करू शकेल.
यावेळी शेलार यांनी ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत 10 हजार 372 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली. या निधीचा उपयोग एआय इनोव्हेशन सेंटर, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, एआय डेटा प्लॅटफॉर्म, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, आणि एआय स्टार्टअप्ससाठी करण्यात येणार आहे.
या बैठकीत मंत्री आशिष शेलार यांनी केंद्र सरकारच्या 2025 पासून सुरू होणाऱ्या वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सच्या संकलनाच्या योजनेवरही चर्चा केली. यातून स्टार्टअप्स, कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांना नवे ॲप्स विकसित करण्याची, विविध भाषांमध्ये सेवा देण्याची आणि विशेष सेवा उपलब्ध करावयाची संधी मिळणार आहे.
आशिष शेलार यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र राज्याने एआयच्या क्षेत्रात सक्षमपणे स्थान मिळवण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. एआय विविध क्षेत्रात बदल घडवून आणू शकतात. बारामतीमध्ये एआयवर आधारित शेती प्रयोग याचे उत्तम उदाहरण आहे. एआय तंत्रज्ञान विविध क्षेत्रांत बदल घडवून आणू शकते, असे त्यानं स्पष्ट केले.