जळगाव । बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यात थंडी गायब झाल्याचं चित्र होत. मात्र, आता पुन्हा थंडीने पुनरागमन केलं आहे. काल रविवारीपासून तापमानात घट झाली असून, पुढील काही दिवस थंडीत आणखी वाढ होण्यार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जळगाव जिल्हाभरात डिसेंबरच्या सुरुवातीला दक्षिण भारतात निर्माण झालेल्या फॅगल वादळ आणि ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी होऊन ३२ अंशावर तापमान पोहचले होते. हवामानातील बदलामुळे गायब झालेल्या थंडीचे शहरात पुन्हा आगमन झाले असून रविवारी (८ डिसेंबर) सकाळी १३ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली.
जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा १२ अंशांपर्यंत घसरला असून, पूढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नोव्हेंबरमध्ये शहरात किमान तापमान १०.८ अंशांपर्यंत घसरले होते. त्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला दक्षिण भारतात निर्माण झालेल्या फैगल वादळामुळे काही राज्यांमध्ये पावसाच्या आगमनामुळे विचित्र वातावरण तयार होऊन थंडी गायब झाली होती. महाराष्ट्रातदेखील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. ढगाळ वातावरणामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. मात्र रविवारी पहाटे तापमान ११.५ अंशांपर्यंत कमी झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून रात्री उशिरा आणि पहाटेच्या गारठ्यात वाढ झाली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा आणखी घसरणार आहे. दोन दिवसांनी तापमान ११ अंशांवरून घसरून १० किंवा ९ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात हवा कोरडी राहणार असून, आकाश निरभ्र राहील, असे सांगण्यात आले आहे.