Maharashtra Weather: राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढला आहे. आज (ता. ९) कोकणात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे तीन दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत. या दिवसांत उन्हाचा तडाखा जास्त जाणवणार आहे.
संपूर्ण राज्याला कडक उन्हाच्या झळा बसत आहे. असं असताना पुणे शहराचा पारा 40 अंशावर पोहोचला आहे तर सोलापूरचे तापमान 39.1 अंशावर होते. उष्णतेची लाट पुढील तीन दिवस अधिक असणार आहे. कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पुणे, जळगाव, कोल्हापूर, निफाड, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नागपूर येथे तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. राज्यातील कमाल तापमान सतत वाढत असल्यामुळे उष्णतेच्या झळा आणखी वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
आज कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर सिंधुदुर्गात हवामान सरासरीपेक्षा उष्ण आणि दमट राहणार आहे.