---Advertisement---
जळगाव : शहरातील हवेच्या गुणवत्तेत नोव्हेंबर महिन्यात मोठी घसरण वाढ झाली असून, शहराची हवा ‘खराब’ श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण आणि धुलीकणांचे प्रमाण रोखण्यास मनपाला अपयश आले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अहवालानुसार, गेल्या महिन्यात केवळ ८ दिवसच हवेची गुणवत्ता समाधानकारक राहिली, तर उर्वरित २० दिवस हवेचा निर्देशांक १०० च्या पुढेच राहिला होता. दोन दिवस तर हवेने ‘धोकादायक’ पातळी ओलांडल्याचे समोर आले आहे.
जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात जळगाव शहराची हवा तुलनेने चांगली होती. ऑक्टोबर महिन्यातही दिवाळीचे काही दिवस सोडले, तर हवेची गुणवत्ता समाधानकारक राहिली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात शहरातील हवामानाचा समतोल बिघडला.
थंडीची लाट आणि काही दिवस ढगाळ वातावरण यामुळे हवेतील धुलीकण आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढले. नोव्हेंबर महिन्यात अनेक दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० ते १५० च्या पुढे होता. यातील २१ आणि ३० नोव्हेंबर रोजी हा निर्देशांक २०० च्या पुढे गेला. २१ नोव्हेंबरला सर्वाधिक २४१ आणि ३० नोव्हेंबरला २३३ पर्यंत प्रदूषणाची पातळी पोहोचली होती.
जळगाव महानगरपालिका प्रशासनाकडून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे कितीही दावे केले जात असले तरी, नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार, शहरातील प्रदूषण आणि धुलीकणांचे प्रमाण रोखण्यास मनपाला अपयश आले आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि धुळीवर नियंत्रण ठेवण्यात मनपा अपयशी ठरल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.









