भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादी संघटनांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील पोलिसांनीही दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पोलिसांनी ११ ठिकाणी छापे टाकले आहेत.
दहशतवाद्यांवर कडक कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पोलिसांनी दहशतवाद्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर १५० दहशतवादी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणाऱ्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही पोलिस कारवाई केली जात आहे. याअंतर्गत अनेक ठिकाणी छापेमारी तीव्र करण्यात आली आहे.
पोलिसांनी काय म्हटले?
जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, या कारवाईअंतर्गत, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवादी सहकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. यूएपीए कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून पुढे नेण्यात येत आहे. या क्रमाने मंगळवारी ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
शोपियानमध्ये तीन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हे तिन्ही दहशतवादी लष्कर-तैयबाचे होते. ऑपरेशन केलर अंतर्गत झालेल्या चकमकीत दहशतवादी संघटनेचे तीन सदस्य मारले गेल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. राष्ट्रीय रायफल्स युनिटला शोपियानमधील शोकल केलरच्या सामान्य भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. यानंतर, चकमकीत तीन कट्टर दहशतवादी मारले गेले. सध्या ऑपरेशन सुरू आहे.