मालवण पोलिसांची कारवाई ! शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

#image_title

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळून पडल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या प्रकरणातील मुख्य आरोपी मूर्तिकार आणि सल्लागार हे दोघे सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत. अशातच आता पुतळ्याच्या जोडणीचे काम करणाऱ्या परमेश्वर रामनरेश यादव याला मिर्जापुरमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर संशयित आरोपीला आज मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, न्यायालयाने त्याला न्यायलयीन कोठाडी सुनावली आहे.



या प्रकरणात यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली आहे. ते अद्याप सावंतवाडी येथील न्यायालयीन कोठडीत आहेत. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना न्यायालयीन कोठडी असून त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही.

चुकीच्या आणि निकृष्ट पध्दतीने पुतळा उभारणी केल्याने जीवित हानी करण्याचा प्रयत्न तसेच, शासनाकडून पुतळा उभारणीसाठी उपलब्ध करुन घेतलेल्या निधीचा योग्य वापर न करता निकृष्ट बांधकाम करुन शासनाची फसवणूक केली आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. म्हणून जयदीप आपटे, प्रोप्रायटर मेसर्स, आर्टिस्टरी, डॉ. चेतन एस. पाटील, स्ट्रक्चरल कन्स्लटंट यांच्याविरुद्ध अशी कायदेशीर फिर्याद मालवणचे सार्वजनिक बांधकाम विभागा सहाय्यक अभियंता श्रेणी एक या पदावर कार्यरत असलेले अजित जनकराज पाटील यांनी मालवण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. यावरून या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका तिसऱ्या संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.