मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत २०-२५ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासंदर्भात त्यांनी घोषणा देखील केली होते. त्यांनी कोण कोणत्या मतदार संघांत निवडणूक लढवणार आहोत याची माहिती ३ नोव्हेंबर रोजी दिली होती. मात्र , आज सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी एकही जागेवर उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणले की, मित्र पक्षांची यादी आली नसल्याने निवडणूक लढणार नाही. मित्र पक्षांची यादी आलेली नाही. एकाच जातीवर कुणी निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढणार नाही, ही माघार नाही तर गनिमी कावा आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
तसेच त्यांनी मराठा उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचा सूचना त्यांनी दिल्या आहेत. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. फक्त उमेदवार पाडायचे,” असे आमच्या बैठकीत ठरल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.