जळगाव : येथील मराठा समाजातील लघु ते मोठ्या स्तरावरील उद्योजकांची साखळी निर्माण करून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी उद्योगाच्या म ाध्यमातून स्वावलंबी बनावे, यासाठी मराठा उद्योजक कक्षातर्फे रविवारी (२० एप्रिल) ‘मराठा उद्योजक महाअधिवेशनाचे’ भव्य आयोजन करण्यात येणार आहे.
या अधिवेशनात तीन सत्रांमध्ये उद्योग व व्यवस्थापन क्षेत्रातील मार्गदर्शक तज्ज्ञांचे सत्र, विशेष मुलाखती व प्रोत्साहनपर संवाद घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मराठा उद्योजक कक्ष जिल्हाध्यक्ष प्रा. संजय पाटील व संगीता पाटील यांनी दिली. या वेळी किरण बच्छाव, प्रतिभा शिंदे, सुरेश पाटील, कल्पना पाटील, प्रमोद पाटील, प्राचार्य एल. पी. देशमुख, भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रथम सत्रात पुणे येथील मगरपट्टा सिटीनिर्माते सतीश मगर, शरद ठाकरे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर तर स्वागताध्यक्ष आ. मंगेश चव्हाण, सहस्वागताध्यक्ष रोहित निकम, किरण बच्छाव आणि अधिवेशन कार्यवाह राजेंद्रसिंह पाटील आदी उपस्थित राहतील.
द्वितीय सत्रात सतीश मगर यांची विशेष मुलाखत बी. बी. ठोंबरे हे घेणार आहेत. उद्योगाची पायाभरणी व नियोजन या विषयावर शरद ठाकरे मार्गदर्शन करतील. यशस्वी उद्योजक विलास शिंदे हे शेती उद्योगातील आधुनिक संधी, तर सुनील किर्दक हे उद्योजक कसा घडवावा या विषयावर मार्गदर्शन करतील, असेही त्यांनी सांगितले.
अधिवेशनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना केली. दलित बहुजन समाजासाठी आवाज उठवून सुरू झालेली ही चळवळ आज विविध कक्षांद्वारे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवणारा एक महत्त्वाचा मंच बनली आहे.
Jalgaon News : जळगावात मराठा उद्योजक महाअधिवेशनाचे आयोजन, नवउद्योजक घडवण्याचा संकल्प
