जळगाव एमआयडीसीतील मानराज मोटर्स शोरूमला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

#image_title

जळगाव : एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर्स शोरूमला आज बुधवारी सकाळी ७ वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की, अग्निशमन दलाच्या १५ बंबांच्या सहाय्यानेही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग अजूनही सुरू असून, घटनास्थळी धुराचे लोट उठत आहेत.

WhatsApp Image 2025 01 02 at 44546 PM 1

एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर्स शोरूमला सकाळी ७ च्या सुमारास शोरूमच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या साहित्य ठेवलेल्या गोदामाला अचानक आग लागली. बंदिस्त जागेमुळे आग वेगाने पसरली. खिडक्यांमधून बाहेर येणाऱ्या आगीच्या लोळांमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

या आगीत शोरूममधील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अविरत प्रयत्न करत आहेत. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

परिसरात खळबळ

घटनेमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत घटनास्थळ सील केले आहे.

अधिक तपास सुरू

एमआयडीसी पोलिस आणि संबंधित यंत्रणा आग लागण्यामागील कारणाचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.