जळगाव : शासकीय अधिकारी व जनता यांच्यात माहिती अधिकार कार्यकर्ते दुवा बनण्याचे काम करत असतात. या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कामकाज करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असतो. यासंदर्भांत जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. ही बैठक रविवारी सद्गुरु एज्युकेशन सोसायटीच्या बी.एड. कॉलेज येथे घेण्यात आली. यावेळी योग्यरीत्या काम करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कुठेही अन्याय होत असल्यास किंवा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे त्यांच्यावर दडपण येत असल्यास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील अशी ग्वाही देण्यात आली.
या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हेंनी सांगितले की, वैयक्तिक कामांसाठी व भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा उचित वापर नक्कीच करा. पण त्यासोबतच जनतेला उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यास व जास्तीत जास्त जनहितार्थ कामे केल्यास माहिती अधिकार कार्यकर्त्यांविषयी जनतेमध्ये व शासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील चांगली व उजळ प्रतिमा तयार होईल. योग्यरीत्या काम करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कुठेही अन्याय होत असल्यास किंवा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे त्यांच्यावर दडपण येत असल्यास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकाराचे काम करतांना त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे बरे वाईट अनुभव सांगितले. तसेच त्यांना येणाऱ्या समस्या व शंका यांचे निरसन देखील यावेळी करण्यात आले.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, पाचोरा तालुकाध्यक्ष पंकज पाटिल, एरंडोल तालुका अध्यक्ष सिताराम मराठे, राजधर महाजन, ज्ञानेश्वर पाटील, आनंद वानखेडे, यासीन तडवी, भगवान चौधरी, विज्ञान पाटील, मधुकर माळी, अंकुश चव्हाण, गुणवंतराव सोनवणे, राजेश खडके, प्रकाश सपकाळे, प्रभाकर महाजन, संदीप चौधरी,गणेश देसले, प्रेमराज पाटील, शाकीर शेख यांच्यासह फेडरेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.