Maharashtra Assembly Elections Dates: निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका असून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.या पार्श्वभूमीवर आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी राज्यात पुरुष मतदार 4.95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 56,997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नवमतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षफुटीमुळे दोन गट निर्माण झाले आहे. याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान या सगळ्यात आता दोन्ही युतींमध्ये जागावाटपावरून वाद आणि मतभेद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.