Nandurbar News: मंत्री डॉ. उईके यांनी घेतली दीपाली चित्ते यांच्या कुटुंबाची भेट, दिले पालनपोषणाचे आश्वासन

नंदुरबार : दिपाली सागर चित्ते या महिलेचा मलोनी येथे हाणामारीत मृत्यू झाला. तिच्या वारसांच्या शिक्षणासह पालनपोषणाची जबाबदारी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतली असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. मंत्री डॉ. उईके यांनी आज शहादा तालुक्यातील मलोनी-लोणाखेडा येथे पंधरा दिवसांपूर्वी हाणामारीत मृत झालेल्या दीपाली सागर चित्ते यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. याप्रसंगी परिवारासोबत  सहवेदना प्रकट करताना ते बोलत होते.

यावेळी आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., नंदुरबारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, प्रांताधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार दीपक गिरासे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, दिपाली चित्ते यांच्या हत्येतील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच, पीडित कुटुंबाला आदिवासी विकास विभागातून सर्वतोपरी मदत केली जाईल. महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी दक्षता घेतली जाईल, असे मंत्री उईके यांनी सांगितले. भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

दीपाली चित्ते ह्या अनुसूचित जनजातीच्या रणरागिणी होत्या. तिने आरोपीच्या अवैध व्यवसायांना विरोध केल्यामुळे त्या वैमनस्यातून दिपाली चित्ते यांची हत्या करण्यात आली आहे. असे आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी चित्तेंच्या कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर सांगितले.