भंगार चोरी प्रकरण: आमदार भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न, सीआयडी मार्फत चौकशीची केली मागणी

जळगाव : महानगरपालिकेतील भंगार प्रकरणी पोलीस निरीक्षक महेश शर्मा आणि नगररचना विभागातील दिगेश तायडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत केले. याप्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी आ. भोळे यांनी यावेळी केली.

आमदार भोळे यांनी आरोप केला की, भंगार चोरी प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी तक्रारीत खडाखोड केली. त्यांनी मुख्य आरोपी सुनील सुपडू महाजन या नावाऐवजी सुनील वामन महाजन असे नाव तक्रारीत नोंद केले आणि गुन्ह्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, कारण आरोपीला पकडण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. आमदार भोळे यांचे म्हणणे आहे की, आरोपी न्यायालयात जामीन दाखल करू शकत असतानाही पोलीस त्याला शोधण्यात अयशस्वी ठरले आहेत.

त्याचप्रमाणे, आमदार भोळे यांनी नगररचना विभागातील दिगेश तायडे यांच्या बाबतीत आरोप केला की, तायडे यांनी कोट्यवधी रुपयांचे प्लॉट रिवाईस करून पत्नीच्या नावे घेतले. त्यांनी नगररचना विभागातील कामांसाठी पैसे घेऊन कामे करत असल्याचेही सांगितले. या संदर्भात सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भोळे यांनी विधानसभेत केली आहे.
आमदार भोळे यांनी अधिकृतपणे मागणी केली आहे की, महानगरपालिकेच्या 15 व्या मजल्यावरील नगररचना विभाग तसेच माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची चौकशी करण्यात यावी. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रशासनावर दबाव येत आहे, आणि राजकीय वर्तुळात या प्रकरणाबद्दल चर्चेला उधाण आलं आहे.