जळगाव : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत जळगाव जिल्ह्यातील ५ जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा तिकीट जाहीर करण्यात आले. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा तिसऱ्यांदा संधी दिली आहे. पक्षाच्या या निर्णयाचे आमदार सुरेश भोळे यांनी स्वागत करत पक्षाच्या वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या विविध आघाडींच्या पदाधीकारी व कार्यकर्ते यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे आभार मानले आहेत.
उमेदवारीबद्दल बोलतांना आमदार भोळे म्हणाले की, मी जनतेचा सेवक असून पुन्हा जनतेत जाऊन त्यांची सेवा करण्याचे काम मी करेन. राहिलेली विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मी कार्यकर्त्यापासून आमदार झालो आहे. यामुळे कार्यकर्ते माझ्या सोबत असल्याने याचा मला आनंद आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही सेवेतून सत्ता आणि सत्तेतून सेवा ही आहे. याच विचारधारेनुसार मी सेवा करत असताना जनतेने मला आशिर्वाद दिले. समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू ठेवून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आम्ही मागील दहा वर्षांपासून करीत आहोत. प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम आम्ही करीत आहोत. प्रत्येकाला न्याय देण्यासोबत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत देव, देश आणि धर्म यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. यामुळे नक्कीच जनता मला आशीर्वाद देईल असा मला मोठा विश्वास आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच जेष्ठ नेते नामदार देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमचे सर्व पदाधिकारी, महानगरअध्यक्ष, मंडलाध्यक्ष, बूथ प्रमुख, सर्व आघाडीच्या मोर्चाचे कार्यकर्ते सर्व कार्यकर्त्यांना विश्वासाला पात्र ठेवण्याचा मी मागच्या दहा वर्षात काम केले आहे. पक्षाने माझ्यावरती परत विश्वास टाकलेला आहे. मला वाटतं मी एक कार्यकर्त्यातून आमदार झालो म्हणून मला या गोष्टीचा समाधान आहे की कार्यकर्ते सुद्धा आमच्याबरोबर आहे.