‘देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करत आहेत’ शरद पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी यांचे कौतुक…!

---Advertisement---

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मुंबईत आयोजित माजी प्रदेश व जिल्हा पदाधिकारी स्नेहमेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. वैचारिक मतभेद असले तरी देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी मोदी करत असलेल्या कामाचे कौतुक केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, “मी वयाच्या १८व्या वर्षी युवक काँग्रेसमध्ये सहभागी झालो. त्यावेळी इंदिरा गांधी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. पुढे त्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्या कार्यपद्धतीतून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले.”

यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी झालेल्या भेटीचाही उल्लेख केला. “आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहरूंना भेटायला गेलो होतो. मात्र ते समोर आल्यानंतर काय बोलायचे हेच विसरलो,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

पंतप्रधान मोदींबाबत बोलताना पवार म्हणाले, “नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी असू शकते. पण आज देशाच्या बाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करत आहेत, ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. देशाची प्रतिष्ठा जिथे येते, तिथे राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत.”

शरद पवार यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, याआधीही त्यांनी विविध प्रसंगी मोदी यांच्या काही निर्णयांचे आणि कार्यशैलीचे कौतुक केले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---