मुदत पूर्ण होऊनही वर्षभरात रस्त्याचे काम करण्यास मक्तेदार असमर्थ

 

तरुण भारत लाईव्ह ।९ जानेवारी २०२३। शहरातील खराब रस्ते हा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपैकी एक प्रश्न आता झाला आहे. शहरातील जागोजागी ‘अमृत’च्या कामांमुळे झालेले खड्डे, लांबणीवर पडलेली रस्त्यांची कामे यामुळे खड्डे आले की जळगाव सुरू झाले अशाच स्वरात जळगावकरांसह बाहेरील नागरिकही आता जळगावला संबोधू लागले आहे, तर दुसरीकडे कामे घेऊन, मक्तेदार मुदत संपूनही कामे पूर्ण करत नसल्याची प्रचिती नुकतीच आली आहे. शेवटी निधी परत गेल्यावर या मक्तेदारांचे डोळे उघडतील का? असा प्रश्न आता जळगावकर नागरिक विचारत आहेत. यामुळे येथील समर्थ कंन्स्ट्रोवेल प्रा. लि. कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात मनपाच्या शहर अभियंत्यांनी नोटीस बजावली आहे.

पुढील 3 वर्षे काम घेण्यास प्रतिबंध
पुढील 3 वर्षासाठी मनपामध्ये काम घेण्यापासून आपणास प्रतिबंध, काळयायादीत समाविष्ठ करण्यात येईल. तसेच हा रस्ता शहरातील प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणावर असून, रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने मनपाकडे वारंवार या रस्त्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. या रस्त्याचे कामास प्राधान्य देवून याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा निविदा अटीशर्तीनुसार पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, अशी नोटीस मनपाचे बांधकाम विभागाचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी दिली आहे.

शहरातील महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 04, 05.06 मध्ये रस्ते डांबरीकरण करणे, प्रभाग क्रं.04 शास्त्री टॉवर ते भिलपुरा ते ममुराबाद पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत असलेल्या कामाची निविदा मनपातर्फे काढण्यात आली होती. हे काम समर्थ कंन्स्ट्रोवेल प्रा. लि. कंपनीला देण्यात आले होते. त्याचा कार्यादेश 11 जानेवारी 2022 रोजी दिला होता. हे काम पूर्ण करण्याची मुदत 9 महिने होती. त्यानुसार हे काम ऑक्टोबर 2022 मध्ये होणे अपेक्षित होते. परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते व आहे. याबाबत मनपाचे शहर अभियंता यांनी या कामाची तपासणी केली. त्यावरून हे काम महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेचे निधीतील असून हा शासकीय निधी 30 मार्च 2023 पर्यंत खर्च करणे बंधनकारक आहे व याच मुदतीत काम पूर्ण न झाल्यास व शासकीय निधी परत गेल्यास त्यास समर्थ कंन्स्ट्रोवेल प्रा. लि. कंपनील व मक्तेदार सर्वस्वी जबाबदार राहील.
तसेच आपली निविदा भरताना जमा केलेली सुरक्षा अनामत रक्कम व इसारा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल व भविष्यात या कामास जादा खर्च झाल्यास तो आपल्याकडून वसूल करण्यात येईल.