---Advertisement---
Muktainagar News: मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान रविवारी २ ऑक्टोबर रोजी पहाटे मृत्यू झाला असून, या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत रवींद्र रमेश तायडे (वय २७, रा. इंदिरानगर, फुकटपुरा, अंतुर्ली) यांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. रवींद्र यांचे चुलते जगदीश दामू तायडे (वय ७३) यांना त्यांचा मुलगा गणेश तायडे याने मारहाण करून त्यांचा मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. गणेश तायडे हा नियमितपणे दारू पिऊन घरी येत असे आणि त्याची आई व मोठ्या भावाशी भांडण करत असे. तायडे कुटुंबाची मूळ वारसा हक्काची अंदाजे तीन एकर जमीन रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे आहे, जी त्यांचे चुलते मधुकर तायडे कसतात. गणेश वारंवार आपले वडील जगदीश तायडे यांच्याकडे ती जमीन वाटून घेण्याची किंवा तिचा नफा मिळवण्याची मागणी करत होता.
वडिलांनी नकार देताच मारहाण
१ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गणेश कामावरून घरी आला आणि त्याचे आईशी भांडण झाले. आईने त्याला जेवण देऊन शेळ्या ठेवण्याच्या गोठ्यात जाण्यास सांगितले. रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास गणेश पुन्हा गोठ्यातून घराकडे येत असताना त्याने चुलत भाऊ रवींद्र तायडे यांना मी बापाला मारले आहे आणि त्यांना विहिरीत टाकून देणार असे सांगितले.
रवींद्र तायडे यांनी तात्काळ आपल्या मित्रांना (राहुल शिरतुरे, सागर गाडे, रोहित तायडे) सोबत घेऊन गोठ्यात धाव घेतली. तिथे जगदीश तायडे हे बाजेवर झोपलेले होते. त्यांची कांबळ काढली असता, त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता, तसेच त्यांचा डावा हात कोपरातून मोडलेला दिसत होता. त्यावेळी राहुल शिरतुरे यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून जगदीश तायडे यांना विचारणा केली असता, त्यांनी ‘मला गणेशने मारले आहे’ असे स्पष्ट सांगितले.
उपचारादरम्यान मृत्यू
जखमी जगदीश तायडे यांना मोटारसायकलवरून नेता येणे शक्य नसल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत जगदीश तायडे यांना शेती वाटून घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून, मुलगा गणेश तायडे याने कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने, लाथाबुक्क्यांनी आणि विटांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.








