साक्री : साक्री तालुक्यातील जामखेल येथे सहा वर्षांपूर्वी पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून केला होता. खूनप्रकरणी आरोपी विजय लक्ष्मण पवार याला जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी हा निकाल देत दहा हजार रुपयांच्या दंडाचीही शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. गणेश पाटील यांनी बाजू मांडली.
घटनेचा तपशील
सहा वर्षांपूर्वी विजय लक्ष्मण पवार याने सुरेश मोतीलाल थवील यांच्या पत्नीला पळवून नेले होते. या घटनेमुळे दोघांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. सुरेश थवीलने पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ५ मे २०१७ रोजी सकाळी साक्री तालुक्यातील जामखेल शिवारात सुरेश थवील गुरे चारत असताना, विजय पवार याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली होती.
हेही वाचा : मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ
पोलिस तपास आणि खटला
या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून, तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक सुनील भाबड यांनी सखोल चौकशी केली. पुराव्यांच्या आधारे विजय पवारविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सुनावणी शिक्षा
धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या खटल्यात सुनावणीच्या वेळेस अतिरिक्त शासकीय अभियोक्ता गणेश वाय. पाटील, यांनी फिर्यादी शांताराम थैल, घटनास्थळ, कपडे जप्ती, हत्यार जप्ती पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच शव विच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी तसेच या कामातील महत्वाचे ठरलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अंमलदार सुनील भाबड आदीसह ८ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविल्या.
सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने विजय लक्ष्मण पवार याला कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा आणि १०,००० रुपयांचा दंड ठोठावला.