Nandurbar Crime : नंदुरबारात दरोड्याचा प्रयत्न फसला, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

नंदुरबार : शहरातील जगतापवाडी परिसरातील डुबकेश्वर मंदिराच्या समोरील रस्त्यावर रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून ११ लाख ६६ हजार ४८० हजाराच्या सोनेचांदीच्या दागिन्यांसह पिस्टल, गुप्ती, मिरचीपुड, दोरी लोखंडी पोपट पाना असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी रात्री अडीचला जोगिंदरसिंग बचणसिंग शिकलीकर (वय ३२), इम्रान दिलवर शेख (वय १९, दोन्ही रा.सोरापाडा, ता. अक्कलकुवा), निशानसिंग रतनसिंग शिकलीकर (वय ३१, रा. एकता नगर, नंदुरबार, ह.मु.बी. आर.सी. गेट उधना, सुरत, गुजरात), सुमित पाडवी व एक अनोळखी इसम हे नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरताना आढळले. संशयित आरोपी जोगिंदरसिंग शिकलीकर व इम्रान शेख यांच्या ताब्यात एकूण ११ लाख ६६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तर अन्य दोघ पळून गेले. त्यांच्याकडे एक देशी बनावटीची लोखंडी पिस्तल, दोन जिवंत राऊंड, लोखंडी गुप्ती, मिरचीची पुड असलेली प्लास्टीकची पिशवी, ३६ हजार ४०० रुपयांची रोकड, त्यात चलनातून बंद करण्यात आलेल्या दोन हजाराच्या दोन नोटा, मोबाईल फोन, २ लाख ८७ हजार ७०० रुपयांचे ४१.१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख ६६ हजार ४८० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई अभय राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.