Nandurbar Crime : जिल्ह्यातील प्रकाशा येथे अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा प्रशासनाने कारवाई करत रोखला. या कारवाईमुळे आदिवासीबहुल जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात अजूनही बालविवाह होत असल्याचे आणि नियोजन करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रकाशा येथे २४ मे २०२५ रोजी अत्पवयीन मुलीचा विवाह होणार असत्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइन १०९८ यावर प्राप्त झाली. त्यानंतर तत्काळ संयुक्त पथकाने कारवाई करत जिल्हा बालसंरक्षण अधिकारी उमेश पाडवी यांच्या मार्गदर्शनात अधिकाऱ्यांनी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत विवाह रोखण्यात यश मिळवले.
पथकाने प्रकाशा येथील ग्रामसेवक बी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे बालसंरक्षण अधिकारी गौतम वाघ आणि चाइल्ड हेल्पलाइनचे कर्मचारी बाळकृष्ण निकुंभे यांनी मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. या वेळी त्यांना बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ ची माहिती देण्यात आली. तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम आणि कायद्यातील तरतुदीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण, नसल्यास तो विवाह बालविवाह ठरतो. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे आणि असे विवाह आयोजित करणारे, त्यात सहभागी होणारे आणि प्रोत्साहन देणारे यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- आपल्या आजूबाजूला कोठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ किंवा पोलीस हेल्पलाइन ११२ वर संपर्क साधावा.
विनोद वळवी (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार)