नंदुरबार : जिल्ह्यात बिबट्याने वस्तीत येऊन हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबट्याच्या सततच्या होणाऱ्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याला आपला प्राण गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असताना तळोदा तालुक्यात एक बालक घरासमोर खेळत असतांना त्याच्यावर बिबट्याने हल्ला चढविला आहे. सुदैवाने, परिसरातील नागरिकांनी जखमी बालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
तळोदा तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. या परिसरात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात रहिवास आहे. यात प्रामुख्याने बिबट्या वस्तीत येत आहे. बिबट्याने अनेकांवर हल्ले चढविल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी तळोदा तालुक्यात शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला केला होता. यात एका आठ वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला आहे. हि घटना ताजी असतानाच तळोदा शहराला लागून गुजरातच्या आमोदा गावात घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला.
चार वर्षीय बालक घरासमोर अंगणांत खेळत होता. यावेळी बिबट्याने हल्ला केला असता बालक जिवाच्या आकांताने ओरडला. मुलाला बिबट्याने पंज्यात पकडल्याचे मुलामागून जाणाऱ्या मुलाच्या आईच्या व एका गावकर्यांच्या लक्षात आले. यानंतर त्या गावकऱ्यांनी हातातील लाकडी मुसळ बिबट्याच्या तोंडावर मारून बालकाला बिबट्याच्या तावडीतून सोडवत प्राण वाचविले. यानंतर गंभीर जखमी बालकाला उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल केल असून बालकाची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती मिळाली आहे.
बिबट्या लागलीच जेरबंद
घटना घडली यावेळी आजूबाजूच्या लोकांनी वेळीच धाव घेऊन बालकाला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. तर परिसरात नरभक्षक बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. याची दखल घेत लगेच गुजरात वनविभागाने त्या भागात पिंजरा लावला. दुसऱ्याच दिवशी हल्लेखोर बिबट्या जेरबंद झाला आहे.