नंदुरबार : नंदुरबार शहर व जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. यात काही बिबट्याना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. आता नंदुरबार शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मधुबन कॉलनीलगत धुळे रस्त्यावर लांडगा मृत अवस्थेत आढळून आला आहे. बिबट्या व आता लांडगा आढळून आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. बिबटे हे पाळीव जनावरांसह मनुष्यावर हल्ला चढवीत असल्याच्या घटना घडत असतांना मृत अवस्थेत लांडगा आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
नंदुरबार ते चौपाळा या दरम्यान टेकड्यांचा आणि शेतमळ्यांचा परिसर आहे. याच मार्गावरच मधुबन कॉलनी आहे. रविवार, २७ ऑक्टोबर रोजी या मधुबन कॉलनी शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मृत अवस्थेत लांडगा आढळून आला. याबाबतची खबर मिळताच वनसरंक्षक धनराज पवार, वन अधिकारी वर्षा चव्हाण तसेच इतर अधिकाऱ्यांनी परिसरात भेट देऊन अधिकची माहिती जाणून घेतली.
यावेळी वन विभागाच्या पथकाने लंगडा मृत्युमुखी पाडण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यात लांडगा हा कोणत्या कारणाने मृत्युमुखी पडला. त्याच्या मृत्यूचा उलगडा व्हावा ह्या उद्देशाने तातडीने शवविच्छेदन करण्यात आले. नंदुरबार-धुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याने अवजड वाहनांची देखील वाहतूक होत असते. अशाच एखाद्या वाहनाची धडक लांडग्याला बसली असावी. यातून हा लांडगा मरण पावला असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या परिसरात मागील काही दिवसापासून दोन बिबट्यांचा वावर सातत्याने सुरू आहे. त्यापैकी एक बिबट्या पकडण्यात आल्याचा दावा केला जातो. तथापि अद्यापही लोकांना बिबट्याचे दर्शन होत आहे.