Narendra Modi : जम्मू -काश्मीरमध्ये काँग्रेसने उभारलेली ३७०ची भिंत आम्ही पडली : पंतप्रधान नरेंद्र मोदी


नाशिक : काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. एससी-एसटी आणि ओबीसींची प्रगती होऊ नये, अशी काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये ३७० ची भिंत उभारली होती, ती आम्ही पाडली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते प्रचारसभेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि आघाडी हे देशाला कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी संरक्षण उत्पादनात देशाला मागे टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी वाद निर्माण केलेत. त्यांनी ज्या कंपनीच्या बाहेर आंदोलने केली. तीच HAL कंपनी विक्रमी नफा कमवीत आहे. त्यांना एसटी-एससी आणि ओबीसीं यांनी प्रगती करू नये असे वाटते. काँग्रेस लोकांना जातीच्या नावावर लढवत असते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासोबत देशाची कोणतीही चिंता नाही. संविधानाच्या रक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा ते उलट करतात. हे तेच काँग्रेसचे लोक आहेत ज्यांनी ७५ वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लागू होऊ दिली नाही. जम्मू-काश्मीरची राज्यघटना वेगळी होती. काँग्रेसने कलम ३७० ची अशी भिंत बांधली होती की तिथे बाबासाहेबांचे संविधान घुसू शकत नव्हते. आम्ही कलम ३७० हटवले आणि एक देश एक संविधान लागू केले. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर संपूर्ण देशाने आनंदउत्सव साजरा केला. जम्मू-काश्मीरमधून बाबासाहेबांची राज्यघटना हटवावी, अशी या लोकांची इच्छा आहे. सभेत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, नाशिकच्या जनतेने सांगावे की, ३७० कलम हटवल्याने आपण खूश आहोत की नाही. तुम्ही खुश होता, पण काँग्रेस आणि मित्रपक्षांना खटकत आहे. दोन दिवसांपूर्वी, कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ केला. या लोकांना पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमधून हटवायचे आहे. तेथील दलित आणि मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण पुन्हा रद्द करावे, अशी या लोकांना पुन्हा इच्छा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.