NCP News : मिस्टर क्लीन असलेले अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे एकमेव आमदार अनिल पाटील यांना डावलून आरोप असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्याने जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, बुधवारी (२१ मे) झालेल्या बैठकीत आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद द्यावे म्हणून ठराव करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक बुधवारी (२१ मे) पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला अध्यक्षा कल्पना पाटील, प्रवक्ते योगेश देसले यांच्यासह तालुकाध्यक्ष व फ्रंटलप्रमुख उपस्थित होते. बैठकीत खगोलशास्त्रज्ञ (स्व.) डॉ. जयंत नारळीकर आणि (स्व.) राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. तसेच सदस्य नोंदणीसंदर्भातही जिल्हाध्यक्ष पवार यांनी आढावा घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर परिणाम
जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे मंत्रिपद असल्याने त्यांची ताकद वाढली आहे. त्यातुलनेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्रिपदाच्या नसल्याने त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकांसाठी ताकद हवी तर जिल्ह्याला एक मंत्रिपद हवे, असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच भुजबळांऐवजी आमदार अनिल पाटील यांचे पुनर्वसन केले असते तर कदाचित पक्षविस्तारालाही त्याचा लाभ झाला असता. याच मुद्यावरून जळगाव राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे.
मंत्रिपदासाठी अजित पवारांना भेटणार
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद असताना पक्षविस्तार जोमाने सुरू होता. मात्र, नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीने जळगावला स्थान न दिल्याने आधीच नाराजी होती. आता एक मंत्रिपद देणे शक्य असताना पुन्हा डावलल्याने राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.