आता सीसीटीव्हीच्या निगराणीत जळगाव शहर!

जळगाव शहरात एन्ट्री करतानाच बाहेरून येणारे  प्रत्येक वाहन सीसीटीव्ही कॅमेर्‍यात नजरबंद होणार आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते सोमवार, 17 रोजी खोटेनगर स्टॉपजवळ चार, तर चंदूअण्णानगर चौकात चार अशा एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे उद्घाटन करण्यात आले.

एक कॅमेरा पोलिसांसाठी या अंतर्गत ही योजना सामाजिक संस्था तसेच शासनाच्या मदतीने राबविली जात आहे. रोटरी क्लब ऑफ जळगाव तसेच व्यावसायिक शांतीभाई पटेल यांच्या सहकार्याने  खोटेनगर चौकात हे चार कॅमेरा बसविण्यात आले आहेत. हा उपक्रम यशस्वीतेसाठी  परीविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक  आप्पासाहेब पवार यांचा विशेष सहयोग आहे.कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, रोटरी क्लब ऑफ जळगावचे प्रेसिडेंट धनराज कासट,सतीश मंडोरा तर प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, प्रोजेक्ट चेअरमन रोटरी क्लब ऑफ जळगावचे जिगर पटेल, सचिव चिराग शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरात 100 सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही याप्रसंगी सतिश मंडोरे यांनी दिली. प्रताप पाटील म्हणाले की,  कायदा आणि सुव्यवस्था तसेच गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याकामी सीसीटीव्ही खूप महत्वाचे ठरताहेत. त्यानुसार पाळधी गावात 60 कॅमेरे बसविले जात आहे. जळगाव व भुसावळ ही योजना साकार करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य राहील, असे ते म्हणाले.

कॅमेरा छोटा पण इम्पॅक्ट मोठा

हा कॅमेरा छोटा आहे परंतु त्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. शहरात एन्ट्री करतानाच वाहने कॅमेर्‍यात टिपले जातील.अवैध वाहतूक किंवा गुंडागर्दी गुन्हेगारी रोखण्याला त्याची खूप मदत होईल. खोटेनगर आता कॅमेरा बसविला गेल्याने पोलिसांची जबाबदारी वाढली आहे,असे मनोगत पोलीस अधीक्षक एम.राजकूमार यांनी केले. परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब यांच्याबद्दल गुडजॉब असे प्रशंसनीय उद्गगार त्यांनी काढले. जुने जळगावातील स्टेट बँके लुटीत गुन्हेगारांनी फुटेज काढले होते. परंतु रस्त्यावर तसेच खाजगी दुकानदारांचे फुटेज प्राप्त करून पोलिसांनी हा गुन्हा डिटेक्ट केला,अशी माहिती देत पोलीस अधीक्षक एम.राजकूमार यांनी सीसीटीव्ही कॅमेराचे महत्व आणि गरज अधोरेखित केले.