---Advertisement---

Jalgaon News : आता फक्त पिण्यासाठीच पाण्याचे आरक्षण, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘गिरणा’तून चौथे आवर्तन सोडणार

---Advertisement---

Jalgaon News : जिल्ह्यातील हतूनर, गिरणा आणि वाघूर अशा तीन मोठ्या, १४ मध्यम आणि ९६ लघु, अशा सर्वच प्रकल्पांत सद्यःस्थितीत सरासरी ३९.३७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. हतनूर व गिरणा प्रकल्पातून सिंचनासह पेयजलासाठी तीन आवर्तने देण्यात आली आहेत. गिरणा प्रकल्पातून चार आवर्तने पेयजलासाठी आहेत. यापैकी फक्त गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी चौथे आवर्तन एक-दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सोडण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ‘मे हिट’चा तडाखा एप्रिलपासूनच जाणवत आहे. दिवसा ४२ ते ४४ अंशांदरम्यान कमाल तापमानाचा पारा असला, तरी जिल्हावासियांना अतिउष्णतेचा फटका जाणवत आहे. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश लहान मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट होत असून, सर्वच प्रकल्पांत सरासरी ३९.३७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

जिल्ह्यात गत मॉन्सूनकाळात सरासरी पर्जन्यामुळे सर्वच प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा होता. त्यानुसार गिरणा प्रकल्पातून आतापर्यंत सिंचनासह पेयजलासाठी सात आवर्तने निर्धारित होती. त्यानुसार सिंचनासह तीन आवर्तने देण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत गिरणा प्रकल्पात २८.९० टक्के उपयुक्त जलसाठा असून, येत्या एक-दोन दिवसांत फक्त पेयजलासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे प्रशासन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दोन प्रकल्पांत मृतसाठा, पाणी सोडणे अशक्य

हतनूर ४४.७८, गिरणा २८.९०, वाघूर ७४.९१ टक्के, एकूण सरासरी ४३.४८ टक्के अर्थात १५.९५ दशलक्ष घनमीटर जलसाठा मोठ्या प्रकल्पांत, तर मध्यम प्रकल्पापैकी बोरी १.७९ व भोकरबारी १.४८ टक्के जलसाठ्याची मृत जलसाठ्याकडे वाटचाल झाली असून, यातून आता पाणी सोडणे अशक्य आहे. हिवरा १७.०६, अग्नावती १८.५०, शेळगाव बॅरेज २२.९४, मन्याड २४.३९, तोंडापूर २७.१३, बहुळा ३१.७६, अंजनी ३२.९२, तर पूर्व भागातील सुकी ७५.४९, अभोरा ७०.५२, मंगरूळ ४६.७५, मोर ६८.५१ आणि गूळ ६६.२१ टक्के, असा मध्यम प्रकल्पांसह ९६ लघुप्रकल्पांत सरासरी ३९.३७ टक्के अर्थात २१.३८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे.

टंचाईची दाहकता वाढली
सात गावांसाठी आठ टँकर सुरू, तर ३१ विहिरी अधिग्रहित

दरम्यान, जिल्ह्यात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात दोन गावांची तीन टँकरद्वारे तहान भागविली जात होती. याच आठवड्यात पुन्हा टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी वाढली. यात सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात पिंपळगाव, राजदेहरे गावठाण तांडा, कृष्णानगर या तीन गावांसाठी तीन टैंकर, अमळनेर तालुक्यात डांगर आणि तळवाडे या दोन गावांसाठी तीन टैंकर, जामनेर तालुक्यात वाडीकिल्ला, भडगाव तालुक्यात तळवंद तांडा गावासाठी एक टँकरद्वारे तहान भागविली जात आहे. जामनेर ६, एरंडोल १. मुक्ताईनगर ४. पाचोरा ४. चाळीसगाव ४. अमळनेर ८, पारोळा ४ अशा ३१ गावांची तहान ३१ विहिरी अधिग्रहित करून भागविली जात आहे. जळगाव तालुक्यात नवीन विंधन विहिरींना मान्यता देण्यात आली असल्याचेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही सर्वाधिक टैंकर चाळीसगाव तालुक्यात सुरू होते. त्याखालोखल अमळनेर, पारोळा, जामनेर या तालुक्यांत टँकर सुरू होते.

आता फक्त पेयजलासाठीच आवर्तन

गिरणा प्रकल्पावर पाचोरा, चाळीसगाव आणि भडगावसह सुमारे २०० च्यावर ग्रामीण, पालिका पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. प्रकल्पातून आतापर्यंत सिंचनासह तीन बिगर-सिंचनाची आवर्तने सोडली आहेत. उन्हाळ्याची दाहकता, प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठा जिल्हाधिकारी व कालवा समितीच्या निर्णयानुसार फक्त पेयजलाचेच आवर्तन सोडण्यात येईल.
देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता,
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

शहरात पाणीकपात होणार नाही

वाघूर प्रकल्पावरून जळगाव शहरास किमान दोन दिवसांआड निर्धारित वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत वाघूर प्रकल्पात ७४.९१ टक्के अर्थात ६.५७ दशलक्ष घनमीटर असा उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे शहरात पाणीकपात करण्यात येणार नाही. मात्र, जळगावकरांनी अंगणात पाणी मारणे, वाहने धुणे वा विनाकारण पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेत पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

ज्ञानेश्वर ढेरे, आयुक्त, जळगाव महापालिका.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment