मुंबई : स्वतःला कथित माहितीस्त्रोत म्हणविणाऱ्या विकीपीडियामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्या प्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित यंत्रणांना तातडीने हा मजकूर हटविण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून भविष्यात अशाप्रकारे इतिहासाशी मोडतोड होऊ नयेत यासाठी केंद्र सरकार सोबत समन्वय साधून पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विकीपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले गेले आहे. यासंदर्भात तात्काळ विकीपीडिया आणि संबंधित यंत्रणांशी बोलणी करावी आणि ते लिखाण हटवण्यास सांगावे, असे मी महाराष्ट्रातील सायबर विभागाच्या प्रमुखांना सांगितले आहे. यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती करावी. पण अशा प्रकारचे आक्षेपार्ह लिखाण मुक्त स्रोतांवर राहणे चुकीचे आहे. त्यामुळे तिथून ते काढण्याच्या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.”
“विकीपीडिया हे भारतातून संचालित होत नाही. हा एक मुक्त स्त्रोत आहे. त्याचे काही नियम असून त्या नियमानुसार, तिथे लिहिण्याबाबतचे अधिकार काही लोकांना असतात. परंतू, ऐतिहासिक गोष्टींना चुकीच्या पद्धतीने लिहिणे योग्य नसून याबद्दल एक नियमावली तयार करण्यास त्यांना सांगण्यात येईल. पूर्वी समाजमाध्यमांची भौगोलिक चौकट असल्याने नियम करणे सोपे होते. परंतू, आता ही चौकट उरलेली नसल्याने त्याची नियमावली करणे कठीण आहे. आम्ही केंद्र सरकारशीसुद्धा यासंदर्भात चर्चा करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही!
“प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. पण त्याचीसुद्धा सीमा आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही. आपण आपल्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही. त्यामुळे जिथे अश्लीलता ही परिसीमेच्या बाहेर जाते तिथे कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, यासंदर्भात काही नियमावली करता येईल का, याबाबत आमची केंद्र सरकारशी चर्चा सुरु आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.