जळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वर्दळीच्या गोलाणी मार्केटमधील बंद पडलेल्या लिफ्टमधील दुर्लक्षित कचर्याच्या ढिगाला रविवारी दुपारी दोन-अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच अग्नीशमन दल कर्मचार्यांनी तत्काळ धाव घेत बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आगीेचे कारण कळू शकले नाही.
मोठी दुर्घटना झाल्यावरच येणार जाग!
गोलाणी व्यापारी संकुल मोठे मोबाईल हब असून अनेक देैनिकांची कार्यालये, जलसंधारण, प्रौढ शिक्षण निरंतर तसेच अन्य विभागांची कार्यालये, विविध व्यापारी आस्थापना, चार्टर्ड अकांऊंटट यांची कार्यालये आहेत. गोलाणी व्यापारी संकुलात यापूर्वीदेखील भर दुपारी आणि उन्हाळ्याच्या दिवसांतच आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीच्या घटनेमुळे व्यापारी संकुलातील ई आणि अन्य विंगमधील वीजपुरवठा तब्बल दोन-तीन दिवस खंडित करण्यात आला होता.
रविवार असल्यामुळे बहुतांश व्यापारी आस्थापना बंद असल्याने मार्केटमध्ये येणार्या जाणार्या नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणात असते. अन्य वेळी हा प्रकार झाला असता तर गोंधळ उडून मोठी दुर्घटना झाली असती. गोलाणी मार्केट मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक व्यापार्यांमधून उपस्थित होत असून इमारतीचे ‘फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट’चादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.
महानगरपालिका प्रशासकीय इमारतीनजीकच असलेल्या गोलाणी मार्केट परिसरात गेल्या अनेक वर्षापासून लिफ्टची दुरवस्था झाली आहे. देखभाल दुरुस्तीअभावी या लिफ्ट बंदच आहेत. या बंद लिफ्टमध्ये आजूबाजूच्या परिसरातून अडगळीची दुर्लक्षित जागा म्हणून कचरा टाकण्यात येतो. गोलाणी मार्केटच्या ई-विंगमधील बंद पडलेल्या लिप्टमधील कचर्याला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात महापालिकेचा अग्निशमन बंब घेऊन अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
बंद लिफ्ट की कचराकुंड्या
गोलाणी मार्केट चार मजली व्यापारी संकुलात पाच विभाग असून प्रत्येक विभागात जाण्यासाठी लिफ्ट आहेत. या लिफ्ट 2008-09 पर्यंत कार्यरत होत्या. मनपा विद्युत आणि दूरसंचार विभागातर्फे लिफ्टच्या बाजूलाच अनेक लहान अडगळीच्या गाळ्यांमध्ये यंत्रणा आहे.
मनपा वा संबंधित विभागाच्या पदाधिकार्यांचे दुर्लक्ष वा अनास्थेमुळे वा देखभाल दुरुस्तीअभावी गेल्या 20 वषार्ंपासून लिफ्ट बंद अवस्थेत आहेत. परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव असून स्वच्छता कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे स्वच्छतेचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी अनेक व्यापार्यांकडून या अडगळीच्या जागांमध्ये वा बंद पडलेल्या लिफ्टचा वापर कचराकुंड्यांसारखा केला जात असल्याचे चित्र आहे.
अस्वच्छतेच्या कारणास्तव बंद केले होते गोलाणी मार्केट
तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा जळगाव उपविभागीय अधिकारी जलज शर्मा आणि जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी 2016-17 मध्ये पावसाळ्याच्या दिवसातच अस्वच्छतेच्या कारणास्तव व्यापार्यांसह आस्थापनांना नोटीस बजावत चार दिवस गोलाणी मार्केट बंद करण्याचे आदेश दिले होते. यात स्वच्छता कर्मचार्यांची हजेरी घेत या बंद लिफ्ट आणि अडगळीच्या गाळ्यामधून तब्बल 8 टन कचरा काढला होता. त्यानंतर व्यापारी महामंडळाची बैठक होऊन मार्केट परिसरातील वाहनतळ, मार्केटची रंगरगोटीसह सुरक्षिततेसाठी सिसीटीव्ही कॅमेरे, पॅसेजमधील दिवाबत्ती व सुरक्षारक्षक नियुक्तीसह स्वच्छता, सुव्यवस्थेसंदर्भात निविदा प्रकियेची अंमलबजावणीदेखील करण्यात आली. परंतु कमिशन घेण्याच्या कथित आरोपामुळे तत्कालिन जिल्हाधिकार्यांनी यातून अंग काढून घेतल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेसह पार्कीग वाहनतळ वा अन्य सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे.