आमोदा-भुसावळ मार्गावरील भीषण अपघातात दोन ठार, पाच जखमी

तरुण भारत लाईव्ह न्युज फैजपूर : ता. यावल : भुसावळ येथून फैजपूरकडे रिक्षा प्रवासी घेऊन येत असताना तर फैजपूरहून भुसावळकडे जाणारे मालवाहू पिकअप वाहन या दोघांचा समोरासमोर अपघात झाला. यात रिक्षातील दोन प्रवासी ठार झाले, तर पाच जण जखमी झालेे. हा अपघात हा आमोदा गावानजीक १६ डिसेंबर रोजी सकाळी झाला.

सूत्रांनुसार, फैजपूर-भुसावळ रोडवर आमोदे गावाच्या पुढील वळणावर भुसावळहून प्रवासी घेऊन येणारी रिक्षा (क्रमांक एमएच-१९-. सीडब्ल्यू-३२२४), तर फैजपूरवरून भुसावळकडे जाणारे मालवाहू पिकअप वाहन (क्रमांक एमएच-४८-टी-६४१४) यांची समोरासमोर धडक झाली.

यात रिक्षाचालक सय्यद नूर सय्यद रऊफ (५५) हा जागीच ठार झाला, तर रिक्षातील प्रवासी सुरेश पिला पाटील (वय ७४, रा. चिनावल) यास जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला. याशिवाय रिक्षामधील सावदा येथील बुधवारा साळीवाळा परिसरातील रहिवाशी ज्ञानेश्वर दत्तात्रेय साळी (४८), संगीता ज्ञानेश्वर साळी (४०), आरती ज्ञानेश्वर साळी, कांचन ज्ञानेश्वर साळी या एकाच कुटुंबातील चार प्रवासी जखमी झाले.

जखमी खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोहन लोखंडे, गोकुळ तायडे, किरण चाटे, विकास सोनवणे, अरुण नमायते करीत आहेत.