नंदुरबार : थकलेला पगार काढून देणे तसेच शालार्थ यादीत समावेश करुन देतो असे म्हणत लाच घेणाऱ्या दोघा शिक्षकांसह एकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी मोलगी (जि. नंदुरबार) येथील माध्यमिक शिक्षक नरेंद्र राजेंद्र इंद्रजीत (वय ३९ ), नंदुरबार येथील प्राथमिक शिक्षक रोशन भिमराव पाटील (वय ४०) आणि शेतकरी अरुण भगवान पाटील अशा तिघांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेले माहितीनुसार, तक्रारदार यांची पत्नी अक्कलकुवा येथील शाळेत सन २०२१-२०२२ सालापासुन शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत याच वर्षांपासून कांचना केशव वळवी या देखील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या दोघींचे नाव शालार्थ आय.डी. मध्ये समाविष्ठ करायचे होते. तसेच संगिता गजेंद्रसिंग ठाकूर व कांचना वळवी यांचा अडकलेला पगार काढून द्यायचा होता.
याच्या मोबदल्यात धुळे येथील एजंट अरुण पाटील यांना देण्यासाठी मोलगी येथील शिक्षक इंद्रजीत व अक्कलकुवा येथील शिक्षक रोषण आदर्श पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून १ लाख १० हजार लाच मागितली.त्यापैकी सुरुवातीला टोकन अमाऊंट प्रत्येकी २० हजार रुपये दयावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.
याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यावर त्यांनी मागणी बाबतची पडताळणी २५ सप्टेंबररोजी पंचासमक्ष केली. नंतर सापळा रचला तेव्हा मागणी केलेली रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना अरुण पाटील यांना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अंमलदारांनी धुळे येथून ताब्यात घेतले.