कासोदा : येथे ६ ऑक्टोबर रोजी गॅस हंडीचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात आठ जण जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी सागर किसन सूर्यवंशी याचा शुक्रवारी रात्री १० वाजता उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कासोदा गावात शोककळा पसरली आहे.
कासोदा येथील शेतकरी अनिल पुना मराठे हे गढी भागात कुटुंबासह राहतात. रविवार ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांनी गॅस सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर आणले होते. मात्र सिलेंडर बसवल्यानंतर त्यातून गॅस गळती झाल्याने अचानक आग लागली. आगीच्या घटनेमुळे अनिल मराठे आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर पळाले. गॅस सिलेंडरच्या स्फोटात आठ जण भाजले गेले.
या जखमींमध्ये ज्ञानेश्वर देवराम पाटील (वय ४५), माधवराव शामराव गायकवाड (वय ३३), शुभम सुरेश खैरनार (वय २५), सुरेश अर्जुन खैरनार (वय ५०), सागर कृष्णा सूर्यवंशी आणि आबा चव्हाण, नगराज देवराम पाटील आणि घरमालक अनिल पुना मराठे यांचा समावेश आहे. या सर्वांवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, यातील सागर किसन मराठे (सूर्यवंशी) (३२) याचा शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. जळगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याचे पश्चात आजी, आई, वडील, पत्नी व दीड महिन्याचा मुलगा असा परिवार आहे