जळगाव : आपण साधारणपणे म्हणतो की, अन्न हे श्रेष्ठ दान आहे; पण स्वामी विवेकानंद म्हणतात की, अन्नदान हे सर्वात कनिष्ठ दान आहे. कारण, तुम्ही एखाद्याला अन्न दिले, तर तो आठ तासांनंतर पुन्हा कोणाकडे तरी हात पसरतो. त्यामुळे एखाद्याला असे काही दान द्या की, त्याला कधी कोणाकडे हात पसरविण्याची गरज भासणार नाही. मग, हे दान काय आहे. तर ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या माध्यमातून जर का व्यक्ती उभी केली, तर ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि शिक्षणामुळे समाजाला दिशाही मिळते, असे मत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांतप्रमुख अभय बापट यांनी व्यक्त केले.
विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांतप्रमुख अभय बापट यांनी जळगाव दौऱ्यावर असताना दैनिक ‘तरुण भारत’शी संवाद साधला. सुरुवातीला दैनिक ‘तरुण भारत’तर्फे संपादक चंद्रशेखर जोशी यांनी ‘तरुण भारत’चा विशेषांक देऊन अभय बापट यांचे
स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी डॉ. पराग जहागीरदार, नरेंद्र वाघ, जितेंद्र अग्रवाल, अपूर्वा वाणी आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घेऊन एकनाथ रानडे यांनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली. राष्ट्रासाठी समर्पित तरुण घडविण्यासाठी त्यांनी या केंद्राची स्थापना केली.
त्या वेळी जे तरुण राष्ट्रासाठी काही करू इच्छितात, त्यांनी अर्ज करा; पण ही नोकरी नाही, तर राष्ट्रकार्याची संधी आहे, अशी जाहिरात त्यांनी त्या वेळच्या प्रमुख दैनिकांमध्ये दिली होती. त्यातून अनेकांनी अर्ज केले. त्या प्रक्रियेतून काहींची निवडही करण्यात आली. निवड करण्यात आलेली ही मंडळी अरुणाचलच्या त्या काळच्या सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कारण, अरुणाचलच्या लोकांच्या गरजा काय आहेत, हे कळले पाहिजे. त्यांना समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. त्यानुसार त्या ठिकाणी सुरुवातीला सात शाळांच्या माध्यमातून काम सुरू झाले आणि आता तेथील सर्व जिल्ह्यांमध्ये विवेकानंद केंद्राच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांच्या माध्यमातून १५ पेक्षा अधिक आयएएस अधिकारी, अनेक सैन्य अधिकारी तयार झाले आहेत.
केवळ शाळांच्या माध्यमातून नाही, तर सर्व समाज आपल्याबरोबर येत राष्ट्रनिर्मितीच्या कामात सहभागी झाले पाहिजे, यासाठी काम केले गेले आणि ते काम अजूनही सुरू आहे. यासह विवेकानंद केंद्राने ‘आनंदालय’ नावाची चळवळ सुरू केली. यात लहान मुलांना शिक्षणाची आवड निम णि व्हावी, म्हणून या चळवळीतून काम केले जाते. यासह केंद्राच्या विविध उपक्रमांची माहितीही बापट यांनी दिली.
‘वयम’च्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण
सोलापूर येथील ‘वयम’ प्रकल्पाविषयी बापट यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, या उपक्रमात योगाचा अभ्यास शिकविला जातो. यासह ‘परीक्षा द्या हसतखेळत’ हा उपक्रमही राबविला जातो. मुलांना परीक्षेचे टेन्शन येते आणि त्यातून ते नको ते पाऊल उचलतात. काही मुले आत्महत्याही करतात. याचे गांभीर्य लक्षात घेत यावर विवेकानंद केंद्राने काम सुरू केले. ते मॉड्यून म्हणजे ‘परीक्षा द्या हसतखेळत’: ज्यामध्ये मुलांनी स्मरणशक्ती कशी वाढवायची, अभ्यास कसा केला पाहिजे, त्यासाठी कुठल्या योगाचा वापर केला पाहिजे, यावर काम केले जाते आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभही होतो. यासह ‘वयम’च्या माध्यमातून आम्ही शिक्षकांना प्रशिक्षितही करतो. कारण, शिक्षक हे एक पिढी घडवतात. यासह ‘वयम’च्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.