National Lok Adalat : जळगावमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीत ५११९ प्रकरणे निकाली

जळगाव :  येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एका मोटार अपघात प्रकरणात तडजोडीनंतर मयत ट्रॅक्टर चालकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाईपोटी 19 लाख रुपये इन्शुरन्स कंपनीतर्फे मिळाले.

एका मोटार अपघात प्रकरणात नुकसान भरपाई पोटी मयत ट्रॅक्टर चालक भैय्या हिरामण गायकवाड यांचे नातेवाईकांनी जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रकरण दाखल केलेले होते. हे  प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पॅनल क्रमांक 2 चे प्रमुख  एस. आर. पवार, जिल्हा न्यायाधीश 3 जळगाव यांचे समक्ष ठेवण्यात आले. पॅनल क्रमांक 2 चे प्रमुख एस. आर. पवार यांनी इन्शुरन्स कंपनी व पक्षकार यांच्यामध्ये समझोता करून मयत ट्रॅक्टर चालक यांच्या कुटुंबाला 19 लाख रुपये इन्शुरन्स कंपनीतर्फे तडजोडी अंती मिळाली. अर्जदारातर्फे विधीज्ञ महिंद्रा सोमनाथ चौधरी व इन्शुरन्स कंपनीतर्फे विधीज्ञ अनुप देशमुख यांनी प्रकरण पाहिले. पक्षकर यांनी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आभार मानले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार व जिल्हा विधी  सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  एम क्यू एस एम शेख, यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव येथे २८ सप्टेंबर  रोजी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. या अदालतीत एकूण रक्कम एक कोटी एकोणवीस लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी रुपयांची वसुली करून पक्षकारांना वितरित करण्यात आले.

पक्षकारांनी सामंजस्याने प्रकरणे आपसात मिटविली ज्यात प्रामुख्याने बैंकींग, इन्शुरन्स, पतसंस्था यांचे प्रकरणे समाविष्ट होती. लोक अदालतचे पॅनल प्रमुख म्हणून आयोगाचे अध्यक्ष छाया आर. सपके, सदस्य म्हणून आयोगाचे सदस्य प्रतिभा आर. पाटील आणि संजय माणिक यांनी कामकाज पाहीले. लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. हेमंत भंगाळे व सर्व वकील मंडळींनी सहकार्य केले.  तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.

४ हजार ८६ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत १ हजार ३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामाध्यमातून एकूण रक्कम रुपये १९,४९,७९,९०९/- वसुल करण्यात आले. दिनांक २३ ते २७ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ७१० प्रकरणे निकाली काढण्यात आली. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम. शेख यांचे विषेश मार्गदर्शन लाभले.