---Advertisement---
Pachora News : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणास बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक अल्पवयीन मुलगी २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा येथे ब्युटी पार्लरच्या क्लासला जाते, असे असून घरातून निघाली होती. सांयकाळी ६ वाजेपर्यंतही ती घरी न परतल्याने तिचा कुटूंबियांसह नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला तसेच ब्युटी पार्लर, नातेवाईक, तिच्या मैत्रीणींकडे विचारपूस केली. मात्र, मुलगी मिळुन न आल्याने कुटूंबियांनी पोलिसात धाव घेतली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक योगेश गणगे करीत असतांना त्यांना तरुणी बीड जिल्ह्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पिएसआय गणगे यांनी पथकासह बीड गाठत ३० मार्च दुपारी २ वाजता शाहगड तालुक्यातुन अविनाश सोनवणे (वय-२२) या तरुणास अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले.
दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन मुलीचा जवाब घेण्यात आला असून कलमांची वाढ करण्यात आली आहे. तरुणाला ३१ मार्च रोजी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची सबजेलला रवानगी करण्यात आली आहे.









