---Advertisement---
---Advertisement---
जम्मू-काश्मिरातील दाचिगामजवळ असलेल्या हरवान जंगलात सोमवारी झालेल्या भीषण चकमकीत लष्कराने पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाशिम मुसासह तीन पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घातले. ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेणारा सुलेमान शहा ऊर्फ हाशिम मुसा फौजी हा लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर होता. श्रीनगर-सोनमर्ग महामार्गावरील बोगद्याच्या कामावर अशलेल्या सात कामगारांच्या हत्येतही त्याचा सहभाग होता.
मुसाला यमसदनी धाडण्यासाठी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. चकमक स्थळाजवळून १७ ग्रेनेड, एम-४ कार्बाईन आणि दोन एके-४७ रायफली जप्त करण्यात आल्या. माऊंट महादेवजवळ श्रीनगरच्या दाचिगाम परिसरात अतिरेकी असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव राबवत शोधमोहीम हाती घेतली. ही कारवाई झबरवान आणि महादेव कड्यांच्या दरम्यान करण्यात आल्याने त्याला ऑपरेशन महादेव नाव देण्यात आले.
असा काढला माग
जुलै महिन्याच्या सुरुवातीला लष्कराने दाचिगाम जंगलातून झालेला संशयास्पद संवाद लष्कराच्या हाती लागला. त्यानंतर तोयबा आणि जैशच्या संयुक्त पथकाचा माग मागील १४ दिवसांपासून काढला जात होता. या माहितीला स्थानिक भटक्यांकडूनही दुजोरा मिळाला. त्यांनी जंगलात अतिरेकी असल्याचे सांगितले.
वेगात अन् चपळाईने केली कारवाई
अतिरेक्यांबाबत पक्की माहिती मिळताच काही लष्करी पथके पाठवण्यात आली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅरा कमांडोंच्या पथकाला तीन अतिरेक्यांचा सुगावा लागला. त्यांनी वेगवान आणि अतिशय चपळपणे कारवाई करीत अत्यंत घातक आणि क्रूर असलेल्या या तिनही अतिरेक्यांचा खात्मा केला.